Ad will apear here
Next
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; गुरुजी तालीम गणेश मंडळ

पुण्यातील गुरुजी तालीम गणेश मंडळाचा गणपती मानाचा तिसरा आहे. यंदा या मंडळाचे १३१वे वर्ष आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या गुरुजी तालीम गणेश मंडळाचे पुण्याच्या गणेशोत्सवातील महात्म्य अन्यन्नसाधारण आहे. या मंडळाबद्दल...
...........

१८८७ मध्ये स्थापन झालेल्या गुरुजी तालीम गणेश मंडळाचे यंदाचे १३१वे वर्ष आहे. भिकू शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख लालाभाई आणि रुस्तुमभाई नालबंद यांनी या गणपतीची स्थापना केली होती. तेव्हापासून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला हा गणपती आजही तीच प्रतिमा कायम राखून आहे. पुण्यातील सगळ्यात मोठी तालीम असल्याने सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर मानाच्या पहिल्या दोन गणपतींनंतर गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीला तिसरा मान देण्यात आला. 

आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतील फुलांचा रथ हे या मंडळाचे वैशिष्ट्य असते. शताब्दी महोत्सव झाल्यानंतर या मंडळाने वर्गणी घेणे बंद केले आहे. ‘मंडळाचे सभासद आणि कार्यकर्ते स्वखर्चातून गणशोत्सव साजरा करतात. वर्गणी बंद करणारे हे पहिले मंडळ आहे. सर्व सभासद झालेला खर्च समान वाटून घेतात. तसेच कार्यकर्ते किमान १०१ रुपये वर्गणी देतात,’ अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी दिली.

ऐतिहासिक, सामाजिक वारसा लाभलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात मानाचे तिसरे स्थान असणाऱ्या या मंडळाने ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे आपली कार्यपद्धती जपली आहे. मिरवणुकीत पहिले दोन मानाचे गणपती पालखीतून सहभागी झालेले असतात. त्यानंतर गुरुजी तालीम मंडळाचा गणपती फुलांच्या रथातून येतो. सुबक, साजरी मूर्ती फुलांच्या रथात अगदी शोभून दिसते. मूषकारूढ स्वरूपातील शाडूच्या मातीची मूळ मूर्ती १९७२मध्ये  बनवण्यात आली. मंडळाचे कार्यकर्ते आणि तत्कालीन नगरसेवक (दिवंगत) श्यामसिंग परदेशी यांनी पुढाकार घेऊन ही मूर्ती घडवून घेतली. दर वर्षी रंग देऊन ती मूर्ती उत्सवात ठेवली जात असे; पण २०११मध्ये फायबरची मूर्ती तयार करून घेण्यात आली. तीच मूर्ती आता सांगता मिरवणुकीत वापरली जाते. दहा किलो सोन्याचे आणि वीस किलो चांदीचे दागिने कार्यकर्त्यांच्या सहभागातून घडवण्यात आले आहेत.

आकर्षक मंडप, फुलांची आरास एवढीच माफक सजावट असलेला या मंडळाचा गणपतीबाप्पा सर्वांचा लाडका आहे. दर वर्षी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. उत्सवादरम्यान गणेश याग, मंत्रजागर, अथर्वशीर्ष पठण आदी कार्यक्रम राबवले जातात. त्यात भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.

या मंडळाची स्थापना झाली त्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात मेळे आयोजित केले जात. गुरुजी मेळे म्हणूनच ते प्रसिद्ध होते; पण आता जागेची मर्यादा, वाहतुकीची समस्या आदी बाबींमुळे अशा प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले आहेत; मात्र ढोल-ताशा पथकांची पुण्याची जी खासियत निर्माण झाली आहे ती घडवण्यात या मंडळाचा सिंहाचा वाटा आहे. याच मंडळाने ढोल-ताशा पथकांची सुरुवात केली. विमलाबाई गरवारे शाळेचे मुलींचे पहिले पथकही प्रथम याच मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. गेली ३५ वर्षे ज्ञानप्रबोधिनी आणि विमलाबाई गरवारे शाळेचे मुलींचे पथक या मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी होत आहे. शिवगर्जना, नादब्रह्म, चेतक, ही आता नामांकित असलेली सगळी पथके प्रथम याच मंडळाने आणली. 

माफक खर्च करून उरलेला पैसा सामाजिक कार्यासाठी वापरला जातो. दर वर्षी एक नवीन संकल्पना घेऊन जनजागृती केली जाते. यंदा ‘इंधन वाचवा’ या संकल्पनेबाबत जनजागृती केली जाणार आहे. या मंडळातर्फे मुख्यमंत्री सहायता निधी, महिला अनाथाश्रम, बाल सुधारगृहाला आर्थिक मदत दिली जाते. तसेच गरीब खेळाडूंनाही आवर्जून मदत केली जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्या ज्या वेळी तातडीची रक्ताची गरज भासते, अशा वेळी मंडळातर्फे रक्ताची सोय केली जाते.

पर्यावरणपूरक गणशोत्सवासाठीही मंडळाने पुढाकार घेतला आहे. गेली तीन वर्षे गणेशमूर्तीचे विसर्जन नदीत न करता हौदात केले जाते. या निर्णयाला भाविकांचा खूप विरोध झाला होता; मात्र पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी ही बाब आवश्यक आहे, हे लक्षात आल्यानंतर विरोधाला तोंड देऊनही या निर्णयाचे पालन करण्यात आले. गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत गेले असले, तरी मूळ हेतूला धक्का न लावता कालानुरूप त्यात बदल करत, या मंडळाने गणेशोत्सवाच्या कीर्तीत भर घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZCBBF
Similar Posts
उत्सवातील कोहिनूर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा पुण्याच्या गणेशोत्सवातील जणू कोहिनूरच ठरला आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण पुण्याचा गणेशोत्सव बघायला केवळ देशभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही लोक येतात. पुण्यात आलेला कोणीही गणेशभक्त दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय पुणे सोडतच नाही, हेही तेवढेच सत्य आहे. या गणपती मंडळाबद्दल
मंडईतला शारदा गजानन पुण्यातील गणेशोत्सवामध्ये जी महत्त्वाची मंडळे आहेत, त्यापैकी एक म्हणजे अखिल मंडई मंडळ. शारदा गजाननाची सुरेख मूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य. या मंडळाबद्दल...
केसरीवाडा गणपती.. ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्यांच्या केसरीवाड्यातील गणपती हा पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी पाचवा गणपती आहे. त्या गणपतीबद्दल...
श्री कसबा गणपती लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी १८९३मध्ये पुण्यात सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १२५ वर्षे होत आहेत. त्यांनी लावलेल्या या रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे. काळानुसार या सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप बदलले असले, तरी श्रद्धा कायम आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यनगरीतल्या मानाच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language